- दणदणीत विजयाने चिंचवड विधानसभेवर पुन्हा फडकावला भाजपचा झेंडा..
- नाना काटेंना भोवले राहुल कलाटेंचे बंड; अन्यथा निकाल वेगळा असता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२३) :- भाजपच्या उमेदवार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी अखेर चिंचवडचे मैदान मारलेच. एकीकडे राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसची ताकद असणारा महाविकास आघाडीचा उमेदवार आणि दुसरीकडे तगडा बंडखोर अपक्ष उमेदवार या दोघांचेही तगडे आव्हान असताना देखील त्यांनी दोन्ही उमेदवारांना पराभवाची धूळ चारीत तब्बल ३६०९१ एवढ्या मताधिक्क्यांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. शेवटी मतदारांनी पक्षीय राजकारणाला बळी न पडता आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अपर्ण करीत घरातील महिला उमेदवाराला मतदान केल्याचे निवडणूकीत पडलेल्या मतांच्या आकडेवारी वरून स्पष्ट होते.
भाजप महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना १,३५.४३४ एवढी मतं मिळाली आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे ९९३४३ एवढी मतं मिळाली तर, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना ४४०८२ एवढी मतं मिळाली आहेत. अजूनही टपाली आणि ETPBS मतमोजणी प्रतीक्षेत आहे. त्यामुळे उमेदवारांची मतांची आकडेवारी वाढू शकते.
सर्वाधिक मतदारसंख्या आणि उमेदवारांची भाऊ गर्दी यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल हाती यायला गुरुवारची संध्याकाळ उजाडली. त्यामुळे सर्वांचीच निकालाविषयीची उत्कंठा ताणली गेली होती. प्राप्त झालेल्या मतदान मतमोजणीने आज सकाळी आठच्या सुमारास थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी ९ वाजता पहिल्या राउंडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप यांना ४०५३ मतं पडली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाविकास आघाडीचे नाना काटे यांना ३०६४ मतं पडली होती. तर तिसऱ्या क्रमांकावर राहुल कलाटे होते. त्यांना १२६७ मतं मिळाली होती. नोटाला १०६ मतं पडली होती. सुरुवातीपासूनच जगताप या आघाडीवर होत्या. अखेरपर्यंत त्यांनी आघाडी टिकवून ठेवली.
निवडणुकीवर प्रभाव टाकणारे कलाटे हे आर्थिकदृष्ट्या प्रबळ उमेदवार होते. त्यामुळं त्यांची उमेदवारी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार हे सुरुवातीपासूनच बोललं जात होतं. त्यातच वंचित बहुजन आघाडीनं राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला. प्रकाश आंबेडकर यांनी कलाटे यांच्यासाठी सभा घेत त्यांना ताकद दिली होती. त्याचा परिणाम निकालात दिसला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचे बंड वेळीच थंड झाले असते तर, परिस्थिती वेगळी दिसली असती.
राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या ‘चिंचवड पोटनिवडणुकीसाठी तब्बल २८ उमेदवार रिंगणात होते तर, एकूण ५१० मतदान केंद्रांवर तब्बल २ लाख ८७ हजार ४८९ नागरिकांनी मतदान केले. एकूण ५०.५३ टक्के मतदान केले गेले. थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी आठला मतमोजणीस सुरुवात झाली. एकूण १४ टेबलवर ३७ फेऱ्या पार पडल्या. ईव्हीएमवर प्रत्येक उमेदवारांसह नोटावरील मतांची मोजणी व नोंदणी तसेच, त्यांची बेरीज आदींमुळे एका फेरीस ३० मिनिटांचा कालावधी लागत होता.
आ. लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघात केलेल्या कामाची पोचपावती म्हणून माझा विजय निश्चित होता. आम्ही आ. जगताप यांनी केलेली कामे घेऊन विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली. मतदारांनी आ. जगताप यांच्या प्रमाणेच माझ्यावर विश्वास दाखविला आहे. आ. जगताप यांनी केलेला विकास यापुढे मी चालू ठेवणार आहे, अशी ग्वाही देते.
अश्विनी लक्ष्मण जगताप – नवनिर्वाचित आमदार, चिंचवड विधानसभा…