- साधे डिपॉझिट देखील वाचवू शकले नाहीत; महापालिका निवडणूक देखील अवघड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना धक्का दिला आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये १ लाखांहून अधिक मते घेणारे राहुल कलाटे यांचे या पोटनिवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे निवडून येण्याचा दावा ठोकणारे कलाटे यांचे राजकीय वजन नक्कीच घटले असून, त्यांना आगामी महापालिका निवडणूक देखील अवघड जाईल, अशी शक्यता दिसतेय. त्यांच्यासोबतच इतर २५ अपक्ष उमेदवारांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे.
पोटनिवडणुकीसाठी प्रथमच सर्वाधिक २८ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी तब्बल २६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. एकूण वैध मतदानापैकी उमेदवाराला ४७ हजार ८५५ इतकी मते मिळणे आवश्यक होते. निवडणुकीमध्ये २ लाख ८७ हजार ४७९ मतदारांनी मतदान केले. विधानसभा त्यामध्ये आणखी ३०२ पोस्टल मतांची बेरीज केल्यानंतर एकूण वैध मतांची आकडेवारी २ लाख ८७ हजार ७७९ होते. त्याला ६ ने भागून येणाऱ्या आकडेवारीमध्ये १ मिळवल्या नंतर जेवढी आकडेवारी येईल, तेवढी मते उमेदवाराला मिळणे अपेक्षित होते.
त्यानुसार ४७ हजार ९६४ मते उमेदवाराला मिळणे आवश्यक होते. मात्र, अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह इतर २५ उमेदवारांना तेवढी मते मिळाली नाहीत. अपक्ष राहुल कलाटे यांना ४४ हजार ४१२ मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे.












