- पोटनिवडणुकीतील निकालामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते फुल ‘रिचार्ज’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ मार्च २०२३) :- चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपने विजय साकारला. अश्विनी जगताप यांनी ३५ हजारांहून अधिक मताधिक्य घेत विजय मिळवला. हा विजय भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना समर्पित केला, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचा पराभव झाला नसून मतदारांना भाजप नको असल्याचा कौल दिला. तसेच सहानुभूतीची लाट असल्याचे बोलले जात होते. मात्र, मतदारांनी महाविकास आघाडीला पसंती देऊन एक प्रकारे पराभवच केला असल्याचे महावि आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये ठाकरे गटातील शिवसैनिक त्वेषाने लढेल आणि भाजपला धडा शिकवेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या तुलनेत शिवसेना (शिंदे गट) पूर्ण ताकदीने महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या मागे उभा राहिला. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रचारात उद्धव ठाकरे शेवटपर्यंत सहभागी झाले नाहीत. त्यांनी केवळ ऑनलाइन सभा घेतली, तर आदित्य ठाकरे महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभागी झाले. मात्र, अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या विरोधात स्पष्ट संदेश दिला नाही. कलाटे यांना साथ देणाऱ्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर घाईघाईने कारवाई करण्यात आली. मात्र, पुन्हा ती कारवाई मागे घेण्यात आली. ही निवडणूक आगामी महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम समजली जात होती. या लिटमस टेस्टमध्ये भाजपला पास होण्यात यश मिळाले, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने काठावर पास होण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. या मतदारसंघामध्ये महापालिकेचे १३ प्रभाग येतात, तर या मतदारसंघामधून तब्बल ९३ नगरसेवक महापालिकेच्या सभागृहामध्ये निवडून जातात. त्यामुळेच महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी हा मतदारसंघ मैलाचा दगड ठरतो. या मतदारसंघामध्ये आमदार असल्यावर त्या पक्षाला नगरसेवकांची मोट बांधणे सहज शक्य होते. त्यासाठीच भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने हा गड ताब्यात घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यामध्ये भाजपला यश आले. आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी पोटनिवडणुकीत जोरदार प्रचार करत शहरामध्ये मविआची हवा केली. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक प्रचारामध्ये जोर घेत भविआ’ने दुरंगी केली. राज्य पातळीवरील नेत्यांनी शहरामध्ये येत सभांचा धडाका आणि बैठका घेतल्याने मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे ‘मविआ’च्या कार्यकर्त्यांमध्ये देखील महापालिका निवडणुकीसाठी उत्साह निर्माण झाल्याचे चित्र आहे.












