न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च) : पार्थ पवार यांची मावळ लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषणा झालेली आहे. याप्रसंगी सर्वांचे आभार मानण्याकरीता त्यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार यांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या कार्याची सुरुवात करत आहे. आशाताई पवार आणि अनंतराव पवार यांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेत. साहेबांच्या, दादांच्या आणि सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे भाग्य मला मिळत आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनाच्या वाटचालीत मी यशस्वी होईन.
आघाडीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकत्यांचा प्रतिसाद पाहता मला माझ्या कामासाठी आणखी ऊर्जा मिळत आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या पाठिंब्याने व आशीर्वादाने मावळमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा नक्की फडकणार, यावर माझा विश्वास आहे.
मावळचा दूरगामी विचार आणि शाश्वत विकास करणे, तिथल्या स्थानिकांना न्याय मिळवून देणे, त्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणे हे विषय माझ्यासाठी प्राधान्याचे राहतील. माझ्या देश बाधवांच्या समस्यांकडे लक्ष देऊन संसदेत त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे, यासाठी मी कायम प्रयत्नशील असेन. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्की सार्थ ठरवेन, असे या प्रसिद्धीपत्रकात पार्थ पवार यांनी म्हटले आहे.











