न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च) :- आगामी लोकसभेसाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून नावाची घोषणा झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील लोकसभेसाठी इच्छुक मातब्बर नेत्यांना डावलून ऐनवेळी पार्थ पवार यांच्या नावाचा आग्रह धरला. त्यास पक्षाचे सुप्रीमो शरद पवार यांचा सुरुवातीला विरोध होताच. परंतु, शहरातीलच लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी अजित पवार यांच्या सुरात सूर मिसळत पार्थच्या नावास पाठींबा दर्शविला.
त्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, संदीप काटे, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आदींनी प्रसंगी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पुढाकार घेतला. त्यात ऐनवेळी शेकापने पार्थ पवारला उमेदवारी द्या, ते चांगल्या मतांनी निवडून येतील, अशी आर्जव केल्यानंतर, शरद पवार यांनी मानवर घेतले व पार्थसाठी सकारात्मकता दर्शविली. अगदी कालपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेद्वारांची पहिली यादी जाहीर झाली असताना त्यात पार्थ यांचे नाव नव्हते. त्याlमुळे पार्थ पवार यांचा लोकसभेसाठीचा पत्ता कट होतो की काय, अशी कुजबुज राष्ट्रवादीच्या गोटामध्ये सुरु होती. त्यांच्या नावासमोर प्रश्नचिन्ह होते.
परतू, आज राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत पार्थ पवार यांचे नाव मावळ लोकसभेसाठी जाहीर झाले व सर्वानीच एकदाचे हुश्श…. केले. त्यामुळे शहर व मावळ राष्टवादीच्या कंपूत समाधान व्यक्त झाले. परंतु, राष्ट्रवादीला गटबाजीचा लागलेला शाप यावेळीही आडवा येईल का? राष्ट्रवादीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते गट-तट विसरून एकत्र येतील? सत्ताधारी पक्षाच्या मनमानी कारभाराविरोधात शहर राष्ट्रवादीचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी रुसवा-फुगव दूर सारीत, चुकीच्या कामांना जसा विरोध केला. त्याचपद्धतीने ते पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील? याचे उत्तर २९ एप्रिललाच मिळेल.











