न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२३) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी संचलन तूट आणि अन्य थकीत रक्कम द्यावी, यासाठी रविवारी दुपारी अचानक खासगी ठेकेदारांनी संप केला. त्यामुळे पीएमपीच्या बसेस जाग्यावरच थांबल्या. निम्म्याहून अधिक गाड्या मार्गावर न आल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी शहरातील लाखो प्रवाशांचे हाल झाले.
मे. ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रा.लि., मे. अॅन्टोनी गॅरेजेस प्रा.लि., मे.हन्सा वहन इंडीया लि., मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि., मे. ईव्ही ट्रान्स प्रा. लि. आणि मे. ओहा कम्युट प्रा. लि. यांनी संपात सहभाग घेतलेला आहे.
दरम्यान, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. संप न मिटल्यास इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.















