न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२३) :- भोसरी सहल केंद्राजवळील जलतरण तलाव ऐन उन्हाळ्यात बंद आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षे हा जलतरण तलाव बंद आहे. एप्रिल २०२२ पासून कोविडचे सर्व निर्बंध हटविल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांशी जलतरण तलाव सुरु झाले आहेत. परंतु, भोसरीसह इतर काही ठिकाणचे तलाव अद्याप बंद का आहेत?
तलावाच्या बाहेरील गेटवर बंद असण्याबाबत कोणतेही कारण लिहिलेले नाही. तलाव बंद असल्यामुळे भोसरी परिसरातील नागरिकांना, लहान मुलांना व जलतरणपटुंना पोहण्याच्या आनंदापासून मुकावे लागत आहे.
महापालिकेने तातडीने भोसरीतील हा जलतरण तलाव सुरु करून तो सुस्थितीत व सुरक्षित राहील हे पाहावे, अशी मागणी ऍड. सचिन गोडांबे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.















