- मात्र, वातावरणातील गारव्याने धुळवडीला रंग चढविला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२३) :- तीन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अशातच काल रात्री पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी होळी दहनाचा कार्यक्रम सुरू असतानाच पाऊस आल्याने अनेकांची तारांबळ उडाली होती. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात धुळवड उत्साहात साजरी करण्यात येत आहे. सर्वत्र रंगांची उधळण करत एकमेकांना शुभेच्छा देत पिंपरी चिंचवडकर धुळवड साजरी करत आहेत. प्लास्टिक पिशव्यांचे फुगे, रंग आणि पाणी टाकून आनंदाने हा सण सर्वत्र साजरा होत आहे.
फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून रात्रीचे तापमानही १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवण्यात येत होते. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या हलक्या सरी आणि त्यापाठोपाठ आलेल्या गारव्याने काहीसा दिलासा दिला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरींचा इशारा दिला आहे. मंगळवारी राज्याच्या काही भागात गारपिटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.















