न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मार्च २०२३) :- महापालिकेच्या विविध विभागाच्या कामातील लेखापरीक्षणामध्ये मोठ्या संख्येने आक्षेप प्रलंबित राहतात. त्यामुळे लेखापरीक्षणातील प्रलंबित आक्षेपांची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर दर महिन्याला आढावा बैठक घेण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.
महापालिकेतील प्रत्येक विभागांच्या फायलीचे लेखापरीक्षण विभागामार्फत आक्षेप काढून त्रुटी दूर करण्याचे कामकाज असते. सन २००५ ते २०१५ या दहा वर्षांतील सर्व विभागांच्या फायलींमधील त्रुटी दूर करण्यासाठी आयुक्तांनी मार्च २०२३ चे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे.
या कालावधीत जे आक्षेप असतील त्याची माहिती लेखापरीक्षण विभागाला सादर करण्याची सूचना आयुक्त सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना दिली आहे. या दहा वर्षांतील लेखापरीक्षणातील प्रलंबित आक्षेपांची संख्या मोठी असल्याने पाठपुरावा होणे आवश्यक आहे.












