न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२३) :- थेरगाव येथील पवना नदीवर बटरफ्लाय प्रकारामधील आणि स्टील गर्डरमधील पुलाच्या उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. पुलावरील डांबरीकरण, रंगरंगोटी ही कामे बाकी आहेत. त्याशिवाय, पुलाला दोन्ही बाजूने जोडणाऱ्या जोडरस्त्याचे काम अपूर्ण आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडणार आहे. त्यामुळे त्यानंतरच हा पूल नागरिकांसाठी खुला होणार आहे.
‘पवना नदीवर साकारणारा हा पूल थेरगाव आणि चिंचवड अशा दोन गावांना जोडणार आहे. थेरगाव, प्रभाग क्रमांक ५० आराखड्यातील १८ मीटर रस्त्यावर हा पूल उभारण्यात येत आहे. या पुलासाठी नदीपात्रामध्ये कोणताही पिलर (सपोर्ट खांब) टाकलेला नाही. त्यामुळे नदीचा प्रवाह सुरळीत वाहू शकणार आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात पुलासाठी निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यादेश देऊन कामाला सुरुवात झाली.
थेरगावला पवना नदीवर साकारत असलेला बटरफ्लाय प्रकारातील राज्यातील हा पहिलाच पुल आहे. पुलाच्या कामासाठी सध्या नदीपात्रात भराव टाकलेला आहे. जून महिन्यात पावसाळा सुरू होईल. तत्पूर्वी, उपयुक्त नदीपात्रातील भराव काढावा लागणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पुलावरील डांबरीकरण आणि पुलाच्या जोडरस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. पुलाचे एकूण ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. १०७ मीटर लांबीचा हा पूल आहे. १८ ते २८.२० मीटर इतकी पुलाची रुंदी आहे. या पुलाच्या कामासाठी २५ कोटी १९ लाख रुपये इतका खर्च मंजूर आहे.
थेरगाव येथे बटरफ्लाय प्रकारातील स्टील गर्डरमध्ये साकारणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलावरील डांबरीकरण, रंगरंगोटी तसेच पुलाच्या दोन्ही बाजूला जोडरस्त्यांची कामे बाकी आहे. ही कामे पुढील पाच ते सहा महिन्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहेत. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
– प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता, महापालिका


















