- ठरलेल्या वेळेतच घंटागाडीत नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा द्यावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातून घराघरातून दररोज घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा गोळा केला जातो. हा कचरा सकाळ ते दुपार आणि दुपार ते संध्याकाळ असे दोन पाळीत स्वीकारला जात आहे. मात्र, आता संध्याकाळनंतर घरातून कचरा उचलणे बंद करण्यात आले आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.
शहरात ओला व सुका कचरा विलगीकरणाचे प्रमाण ९० टक्के इतके आहे. घर व दुकानांतून सुका व ओला कचरा वेगवेगळा घेतला जात आहे. त्यासंदर्भात जनजागृतीसाठी विविध संस्थांची नेमणूक केली आहे. घंटागाडीसोबत असलेले स्वयंसेवक ओला व सुका कचरा देण्याबाबत नागरिकांना माहिती देत आहेत. घरातून कचरा घेण्याबाबत निश्चित अशी वेळ नव्हती. त्यामुळे नागरिक जमा झालेला कचरा घराबाहेर, रस्ते व पदपथावर कचरा टाकत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक भाग व गल्लीत घंटागाडीची वेळ निश्चित केली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त वाघ म्हणाले की, सकाळी ते दुपारी आणि दुपार ते संध्याकाळ असे दोन पाळीत घंटागाडीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. नेमून दिलेल्या भागात त्याच वेळेत घंटागाडी जाऊन कचरा संकलन करीत आहे. घरातून कचरा संकलन सकाळ ते संध्याकाळपर्यंत केले जाते. संध्याकाळनंतर घरातून कचरा स्वीकारला जात नाही. ठरलेल्या वेळेत घंटागाडीत नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
ठरलेल्या वेळेवर किंवा नियमितपणे घंटागाडी येत नसल्यास नागरिकांनी महापालिकेच्या ८८८८००६६६६ या सारथी हेल्पलाइनवर तक्रार करावी. त्यावर संबंधित घंटागाडीचालकांकडून खुलासा मागविला जाईल. समाधानकारक उत्तर नसल्यास घंटागाडीचालक व ठेकेदारावर कारवाई करून दंड वसूल केला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी स्पष्ट केले.


















