न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महापालिकेचे २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. निवडणूक संपली तरी, अद्याप अनेक अधिकारी व कर्मचारी रूजू न झाल्याने महापालिकेतील विविध विभागातील कामे खोळंबल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
पोटनिवडणुकीची घोषणा १८ जानेवारीला लागली. त्या दिवसापासून आचारसंहिता लागू झाली. ती दोन मार्चपर्यंत होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांची नियुक्ती झाली. तसेच, पालिकेतील विविध विभागांचे २५० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणूक विभागासाठी नियुक्ती करण्यात आली.
आदेश झाल्यानंतर २४ जानेवारीपासून ते अधिकारी व कर्मचारी थेरगाव येथील निवडणूक विभागात तैनात आहेत. दोन मार्चला मतमोजणी झाल्याने निवडणूक प्रक्रिया संपली आहे. त्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचारी पुन्हा महापालिकेतील आपआपल्या विभागात रूजू होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक संपून नऊ दिवस होऊनही अनेक अधिकारी व कर्मचारी पालिकेत रूजू झालेले नाहीत. त्यामुळे कामाचा खोळंबा होत आहे.
निवडणूक कामकाजास गेल्यापासून सव्वा महिन्यांतील कामे तुंबून पडली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी, प्रकल्प व विकासकामांना विलंब होणार आहे.


















