न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च २०२३) :- चिखली मुख्य चौकातील पीएमपीएल बसस्थानकाचे स्थानिक नागरिक व पीएमपीएल प्रशासनाच्या समन्वयाने स्थलांतर करण्यात आले आहे. चिखली मुख्य चौकातील अपुरी जागा, नियमित होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पीएमपीएलचे चुकणारे वेळापत्रक व स्थानिक नागरिक आणि वाहतूक दारांसोबत होणारे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी पीएमपीएल बस व्यवस्थापन आणि स्थानिक नागरिकांच्या समन्वयाने बस थांब्यांचे स्थलांतर केल्याचे पीएमपीएल कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हे स्थलांतर चिखलीच्या पाटीलनगर परिसरातील पाण्याच्या टाकीलगत असलेल्या गायरान जागेवर झाले आहे. चिखली बसथांब्यावरून विविध मार्गावर धावणाऱ्या ३८ ते ४० बस असून, प्रतिदिन १२० च्या आसपास फेऱ्या नियोजित असतात.
चिखली गावातील बसथांब्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या काहीअंशी कमी होतील. यासोबतच नियोजित बसथांब्याच्या परिसरात प्रवाशांसाठी सर्व सोयी पुरवण्याचे नियोजन केले असून, या ठिकाणी लवकरच प्रवाशांसाठी निवारा व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. – भास्कर दहातोंडे, (डेपो मॅनेजर, पीएमपीएल, पिंपरी)















