न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२३) :- अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृत्यू झाला. पतीचे निधन झाल्यानंतर अवघ्या २५ दिवसांत ही घटना घडल्याने याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना रविवारी (दि. १२) दुपारी काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मधु संकेत मार्कडेय (वय ३२, रा. रहाटणी) असे भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचे नाव आहे.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधु मार्कंडेय यांचे पती संकेत यांचे २५ दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मधू या त्यांच्या वडिलांकडे राहत होत्या. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. दरम्यान, मधु या रविवारी दुपारी बाराच्या सुमारास मैत्रिणीसोबत काळेवाडी परिसरात रुम पाहण्यासाठी गेल्या होत्या. घर मालकिणीने रुम दाखविली. त्यावेळी मधू यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मधु यांच्या मृत्यूबद्दल त्यांच्या नातेवाइकांनी संशय व्यक्त केला. दरम्यान, शवविच्छेदन केल्यानंतर मधु यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने सोशल मीडियावरून दुःख व्यक्त केले. माझ्या प्रिय बहिणीने जगाचा निरोप घेतला. ती मला सोडून गेल्याने मी खूप दुःखी झाले आहे. तुझ्याबाबत काय म्हणायचे आहे ते शब्दात कधीही व्यक्त करू शकत नाही, तू माझी होतीस, तुझ्याशिवाय या आयुष्याचे काय करू? तू नसण्याचा मी कधीही विचार करू शकत नाही. मृत्यू अटळ आहे, परंतू तू गेल्याचे मी कधीही मान्य करू शकत नाही, असे म्हणत भाग्यश्री मोटे हिने दुःख व्यक्त केले आहे.















