- पालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील खासगी शाळांना तंबी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मार्च २०२३) :- पिंपरी- चिंचवड पालिकेच्या शिक्षण विभागाकडे शहरातील खासगी शाळांच्या तक्रारी येत असतात. तक्रारींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नय. त्यांचे वेळेवर निराकरण व्हावे. शाळांनी दिलेल्या आदेशाचे आणि नियमांचे पालन करावे यासाठी प्रशासन अधिकारी यांनी सर्व खासगी शाळांना तक्रारी न येण्यासंदर्भात दक्षता घेण्याची सूचना केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, शालेय व्यवस्थापनाने नियमापेक्षा जास्त फी आकारू नये. शिक्षक पालक संघाची सभा वेळेवर आयोजित करावी. आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या पालकांना विनाकारण त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. फी संदर्भात सविस्तर तपशील शाळेच्या दर्शनी भागावर लावण्यात यावा, पालकांना शाळेतून गणवेश व पाठयपुस्तके खरेदी करणेकामी सक्ती करु नये, सर्व खासगी शाळा व्यवस्थापनाने काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास अथवा शाळेने आदेशाची पायमल्ली केल्याची बाब आढल्यास शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोणत्याही शाळेने शासन मान्यता असल्याशिवाय शाळा चालवू नये. प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा देण्यात याव्यात, वाहतूक सुरक्षिततेबाबत काळजी घ्यावी, शासनाच्या विविध शिष्यवृत्त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात यावा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकविणे अनिवार्य असावे, विद्यार्थी व पालकांना शाळेत सन्मानाची वागणूक मिळावी, विद्यार्थ्याचा दाखला देण्याबाबत कोणतीही तक्रार होणार नाही याची काळजी घ्यावी, सीबीएसई बोर्डाच्या शाळांकडे शासन मान्यता आदेश, ना हरकत दाखला व संलग्नता प्रमाणपत्र नुतनीकरण करणे आवश्यक असल्याचेही पत्रात म्हटले आहे.