न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका-नगरपरिषद, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनचे पदाधिकारी यांची जुनी पेन्शन योजना लागु करण्यासह इतर २५ मागण्यांवर आज सोमवारी (दि. २०) रोजी दुपारी ३.०० वाजता बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये जुन्या पेन्शन संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असुन, जुन्या कर्मचाऱ्यांना व नवीन कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाबाबत कोणताही फरक ठेवणार नाही, असे मुख्यमंत्री यांनी घोषित केले.
नवीन पेन्शन योजना (NPS) रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना (OPS) पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे (OPS) आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची हमी देण्याचे धोरण तत्व म्हणुन मान्य करणे, तसेच महाराष्ट्रातील महानगरपालिका-नगरपालिकांमधील कर्मचाऱ्यांच्या उर्वरीत २५ मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांनी पुकारलेल्या बेमुद संप मागे घेत असल्याची घोषणा करणेत आली. या घोषणांमुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे.
बैठकीस महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका-नगरपरिषद, कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनचे पदाधिकारी शशिकांत ऊर्फ बबन झिंजुर्डे, संजय केणेकर, अशोक जाधव, गणेश शिंगे, गौतम खरात, अशोक जानराव, डॉ. डी. एल. कराड, सुनिल वाळुंजकर, संतोष पवार, रामगोपाल मिश्रा आदी उपस्थित होते.