न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- लावणी कला पुनर्जीवित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय भव्य महालावणी स्पर्धा होणार आहे. एका पेक्षा एक जबरदस्त लावण्या पाहण्याची संधी शहरातील रसिक प्रेक्षकांना मिळणार असून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेतील पहिले पारितोषिक १ लाख रुपयांचे असणार आहे.
याबाबतची माहिती आयोजक आमदार उमा खापरे, महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यावेळी उपस्थित होत्या.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात २५ आणि २६ मार्च रोजी महालावणी स्पर्धा होणार आहे. २५ मार्च रोजी सकाळी ९ ते रात्री ९ असा कार्यक्रम चालणार असून सर्वांना विनाशुल्क प्रवेश असणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन कथक नर्तक डाॅ. पं.नंदकिशोर कपोते यांच्या हस्ते होणार आहे. २६ मार्चला सायंकाळी पाच ‘सवाल जवाब’ हा कार्यक्रम आणि अंतिम फेरी होणार आहे. परीक्षक सुरेखा पुणेकर, मेघा घाडगे यांचे सादरीकरण होईल. त्यानंतर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेत्री मेघना एरंडे करणार आहेत.