न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने शहरातील निवासी व बिगरनिवासी थकबाकीदार मिळकतधारकांवर कारवाई केली जात आहे. तसेच, थकबाकीदारांची नावांची यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली जात आहे. त्यात शासकीय संस्थासह नामांकित कंपन्यांचाही समावेश आहे. तब्बल १४८ कोटी ७९ लाख ६४ हजार १८९ रुपयांची थकबाकी असल्याने टाटा मोटर्स कंपनीलाही नोटीस बजावण्यात आली आहे.
एक हजार कोटींची वसुली करण्यासाठी शहरातील बांधकाम थकबाकीदारांकडून थकीत व मूळ मिळकतकर वसुलीसाठी पालिकेच्या करसंकलन विभागाने कंबर कसली आहे. थकबाकीदारांच्या मिळकतीवर जप्तीची कारवाई पोलिस बंदोबस्तात केली जात आहे. एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या निवासी व बिगरनिवासी मिळकतधारकांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहेत. त्यात राजकीय नेते मंडळी, माजी नगरसेवक, पदाधिकारी, शासकीय व निम्नशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, रुग्णालय, खासगी कंपन्या, वर्कशॉप, मॉल, हॉटेल, बांधकाम व्यावसायिक, दुकानदार व नागरिकांचा समावेश आहे. नोटीस देऊनही थकबाकी भरली जात नसल्याने मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच, नळजोड खंडित केला जात आहे.
या मोठ्या थकबाकीदारामध्ये टाटा मोटर्स कंपनीचाही समावेश आहे. कंपनीकडे तब्बल १४८ कोटी ७९ लाखांचा थकीत कर आहे. त्यासाठी चिंचवड, महापालिका भवन व चिखली विभागीय कर संकलन कार्यालयाने नुकतीच नोटीस बजावली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मिळकती जप्त करून कठोर कारवाई करणारी पालिका या थकबाकीदार कंपनीवर काय कारवाई करते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या पूर्वी उपायुक्त स्मिता झगडे यांनी या कंपनीस तब्बल २०० कोटी थकबाकीप्रकरणी जुलै २०२१ ला नोटीस बजावली होती. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. ती नोटीस नंतर मागे घेत रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढविली होती.
एक लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या निवासी व बिगरनिवासी मिळकतधारकांना कररसंकलन विभागाने जप्तीपूर्व नोटीस बजावली होती. नोटीस देऊनही प्रतिसाद न दिलेल्या १ हजार २०० मिळकती सील लावून जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ७०० कोटींची वसुली झाली आहे. अजून, जप्तीची कारवाई सुरू असून, ती एप्रिल महिन्यातही कायम राहणार आहे. एप्रिल महिन्यात जप्त केलेल्या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे, असे पालिकेच्या करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
थकबाकीदारांकडून मिळकतकर वसुलीसाठी करसंकलन विभागाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. खासगी कंपन्यांसह शासकीय संस्थांनाही नोटिसा देण्यात आल्या आहेत. अधिकाधिक करवसुलीसाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. टाटा मोटर्स कंपनी व्यवस्थापनाची बाजू ऐकून घेतली जाणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
















