न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- :- राज्य शासनामार्फत महानगरपालिका स्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियान (NUHM) राबविण्याकरीता सुचना करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानात आरोग्य कार्यक्रमाशी निगडीत असणा-या सर्व कार्यक्रमांचा समावेश आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व समाजातील अन्य महत्वपुर्ण घटक यामध्ये सुसंवाद निर्माण करण्याच्या दृष्टीने “ आशा स्वयंसेविका ” हा एक महत्वपुर्व दुवा आहे. आरोग्य संवर्धन, विविध प्रतिबंधक व उचारात्मक उपाययोजना तसेच समाजामध्ये जाणीव व जागृती वृदिधंगत करणे यामध्ये आशा स्वयंसेविकेची महत्वाची भूमिका आहे. आरोग्य सेवा व आरोग्य संस्थाची माहिती सर्व घटकांपर्यत उपलब्ध करुन देणे, आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे, आरोग्याच्या बाबतीत लोकांमध्ये मानसिक व सामाजिक बदल घडवून आणणे इ. महत्वपुर्ण कामे आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत करण्यात येत आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आशा स्वयंसेविका यांना शासन मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशिक्षण देण्यात येत असून त्या या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहेत. आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण पुर्ण व्हावे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, आशा स्वयंसेविकांच्या भुमिका व जबाबदारी बाबत जनमानसात जाणीव- जागृती व्हावी या करिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आर.डी.आगा कम्युनिटी सेंटर, संभाजीनगर, चिंचवड येथे आज (दि. २३) रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका यांचा “आशा दिवस” साजरा केला.
कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, डॉ.संगिता तिरुमणी, डॉ.सुनिता साळवे, डॉ.ऋतुजा लोखंडे, रोटरी क्लबच्या डॉ.विभा झुत्सी, वैद्यकीय अधिकारी डॉ.संध्या भोईर, डॉ.अंजली ढोणे, डॉ.विजया आंबेडकर, डॉ.कल्पना गडलिंकर, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.चैताली इंगळे व २१० आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाध्ये “आशा दिवस” याचे औचित्य साधून आशा स्वयंसेविका यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवा म्हणून त्यांची निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमधुन प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्या असणा-या आशा स्वयंसेविका यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याच दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालय स्तरावर देखील “आशा दिवस” आयोजित करण्यात आलेला होता. त्यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेमधील विजेत्या आशा स्वयंसेविका यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानीत करण्यात आले.
















