न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२३) :- स्वतःच्या प्राणापेक्षा देशाचे स्वातंत्र्य महत्त्वाचे अशा प्रखर देशभक्तीने प्रेरित झालेल्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी जीवाची पर्वा न करता इंग्रजी राजवटीविरुद्ध दिलेल्या सशस्त्र लढ्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात देशभर पेरलेली क्रांतीची बिजे अधिक वृद्धिंगत झाली, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त पिंपरी येथील मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच दापोडी येथील शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, सहाय्यक वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, वामन नेमाणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, उमेश बांदल विविध सामाजिक संघटनाचे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
भारत देश १९४७ साली स्वतंत्र झाला. त्यासाठी हजारो क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, तुरुंगवास तसेच शिक्षाही भोगल्या.
भूमिगत चळवळीच्या माध्यमांतून हजारो देशभक्तांनी देशासाठी योगदान दिले. शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांसारख्या क्रांतीकारकांनी देशाकरिता दिलेल्या बलिदानातून देश स्वतंत्र झाला, असे सांगून अशा देशभक्तांच्या देशभक्तीचा आदर्श सर्वांनी घ्यावा, देशाच्या जडणघडणीत आपले योगदान द्यावे असेही अतिरिक्त आयुक्त जगताप यावेळी बोलताना म्हणाले.


















