- आ. खापरे यांची मागणी; विधानपरिषदेत अर्धातास रेडझोनवर चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२३) :- देहुरोड येथील आयुध निर्माण कारखान्याच्या परिसरातील २००० यार्डस क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून १३/१२/२०२२ रोजीच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे तडवळे, किवळे, रावेत, चिखली, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरी वस्त्या बाधित होत आहेत. ही गावे स्वतंत्रपूर्व काळापासून अस्तित्वात आहेत.
नागरी वस्त्या मोठ्या प्रमाणात विकसित होत असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्र एमआयडीसी, एसईझेड, विविध प्रकल्पासाठी जमिनीचा वापर होत असल्याने ७/१२ उताऱ्यावर रेडझोनचे शिक्के मारले आहेत. आ. उमा खापरे यांनी हा विषय (दि. २४) रोजी विधानपरिषद सभागृहात उपस्थित केला. त्यावर अर्धातास चर्चा घडवून आणली. देहूरोड रेडझोनमुळे लाखो शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच लहान मोठे उद्योगांना अडचणी येत आहे, असं त्या म्हणाल्या.
केंद्रीय संरक्षण मंत्री, भारत सरकार यांच्या समवेत तातडीने बैठक लावून त्या बैठकीस संरक्षण विभागाचे अधिकारी, महसुल विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश करून बैठक घेण्यात यावी. जेणेकरुन तडवळे, रावेत, किवळे, चिखली, पिंपरी-चिंचवड येथील रहिवाशांच्या समस्या निराकारण होईल. यावर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात त्यांना आश्वासित केले.