न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम दत्तात्रेय मोरे यांची निवड झाली आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीत त्यांनी ९ मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला.
संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांची मुदत संपल्याने अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत दोघे प्रमुख उमेदवार म्हणून उभे होते. पुरुषोत्तम महाराज मोरे यांना १६४ मते मिळाली तर उमेश सुरेश मोरे यांना १५५ मते मिळाली. तीन मते बाद झाली.
ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पित्ती धर्मशाळेत पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश मोरे होते. भास्कर मोरे, शामकंत मोरे, सुजित मोरे सहायक अधिकारी होते. पुढील दोन वर्षांसाठी पुरुषोत्तम मोरे हे देहू संस्थानचे अध्यक्ष असणार आहेत.