न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस मुख्यालय, निगडी येथे ते नेमणुकीस असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोलीस नाईक रतन कांबळे (वय ३८) असे मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पिंपरी पोलीस लाइन येथे मंगळवारी (दि. २८) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मृत्यूचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. कांबळे यांनी मंगळवारी सकाळी दार उघडले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
खिडकीतून हात घालून दरवाजा उघडला असता कांबळे अंथरुणावर निपचित पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी कांबळे यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.