न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- ‘एच३ एन२’ विषाणूमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. ‘एच३ एन२’मुळे शहरातील मृतांची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी भोसरीतील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता.
पिंपरी-चिंचवड शहरात एक जानेवारीपासून ‘एच ३ एन २’ बाधित १७ रुग्ण आढळले. त्यापैकी १५ रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. १६ मार्च रोजी भोसरीतील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत एकही रुग्ण शहरात नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
करोनाच्या रुग्णांमध्ये किंचित वाढ आहे. रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. गृहविलगीकरणात राहून रुग्ण बरे होत आहेत. सद्यस्थितीत तीन रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. काळजी घ्यावी. मास्कचा वापर करावा. लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.