न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मार्च २०२३) :- पुणे महापालिकेच्या हद्दीतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांना वगळून नव्याने ‘फुरसुंगी-उरळी देवाची नगरपरिषद’ स्थापन करण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचा अध्यादेश काढल्याने या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे.
या निर्णयामुळे आता पुणे महापालिकेच्या हद्दीत बदल झाला आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन्ही गावे २०१७ मध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, या गावांतील मिळकतींना मोठ्या प्रमाणात मिळकतकर लावण्यात आल्याने या गावांतील नागरिक आणि व्यापारी यांनी कर कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिकेकडून कर कमी करण्यात न आल्याने ही गावे महापालिकेतून वगळण्याची मागणी करण्यात आली होती. माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन त्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर ही गावे वगळून या दोन गावांची नगर परिषद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहर सुधारणा समितीची बैठक घेऊन गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्याआधारे आता राज्य सरकारने ही गावे महापालिका हद्दीतून वगळून ‘फुरसुंगी- उरळी देवाची नगरपरिषद’ स्थापन करण्याबाबतचा अध्यादेश काढला आहे. त्यामुळे ही गावे आता महापालिका हद्दीतून वगळली गेली आहेत.
फुरसुंगी आणि उरळी देवाची ही गावे वगळण्यात आली असली, तरी या गावांमध्ये असलेला कचरा डेपो हा महापालिकेकडे असणार आहे. हे क्षेत्र नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आले नसल्याचे अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.