न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ एप्रिल २०२३) :- प्रत्येक घरातून दरमहा ६० रुपयांच्या वसुलीला आज शनिवारी (दि. १) पासून प्रारंभ केला जाणार आहे. वर्षभराची ७२० रुपयांची रक्कम निवासी मिळकतकराच्या बिलात समाविष्ट केली जाणार आहे. दुकाने व इतर व्यावसायिकांना दरमहा ९० ते २ हजार रूपये असे शुल्क आहे.
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या ८ एप्रिल २०१६ च्या अधिसूनचेनुसार घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ लागू करण्यात आला आहे. पालिकेच्या वतीने घंटागाडीच्या माध्यमातून ओला व सुका कचरा दररोज जमा केला जातो. कचरा वेगवेगळा करण्यासाठी पालिकेने जनजागृतीसाठी संस्थांही नेमल्या आहेत. त्यासाठी पालिका दरवर्षी कोट्यवधीचा खर्च करीत आहे.
राज्य शासनाच्या १ जुलै २०१९ च्या स्वच्छता व आरोग्य उपविधी अनुसूचीनुसार पालिकांसाठी उपयोगकर्ता शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यानुसार पालिकेने २० ऑक्टोबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेने नागरिकांकडून सेवा शुल्क वसुली प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजवाणी प्रशासकीय राजवटीत शनिवारपासून केली जात आहे.
शहरातून १ एप्रिलपासून कचरा संकलनासाठी सेवाशुल्क आकारले जाणार आहे. तसेच, ओला व सुका कचरा वेगवेगळा न दिल्यास ५० ते ५० हजार इतका दंड केला जाणार आहे. दररोज १०० किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांनी स्वतःचा कंपोस्टींग प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. त्यासाठी पालिका विविध प्रकारे सहकार्य करीत प्रोत्साहन देत आहे. नागरिकांनी उघड्यावर कचरा न टाकता घंडागाडीत ओला व सुका असा वेगळा करून द्यावा, स्वच्छतेची शिस्त अंगी बाळगावी, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.