न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२३) :- पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेकडून २४ ते ३१ मार्च दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान राँग साईडने वाहन चालविणाऱ्या ३१३ वाहनचालकांवर तसेच ट्रिपल सिट वाहन चालविणाऱ्या १५८ वाहनचालकांवर भादंविस कलम २७९ प्रमाणे एकुण ४७१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव ही औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे आहेत. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरीकांची संख्याही मोठी असुन त्यांच्याकडून दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे.
बेशिस्त नागरीक वाहन चालविताना रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन राँग साईडने तसेच ट्रिपल सिट वाहन चालवुन स्वतःच्या तसेच इतरांच्या जिवीतास धोका उत्पन्न करत करीत आहेत. अपघातांच्या संख्येत वाढ होवुन दिवसेंदिवस गंभीर व किरकोळ स्वरुपाचे अपघात होत आहेत. या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत तसेच वित्तहानी होत आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
यापुढेही वाहतुक विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल. बेशिस्त वाहनचालकांवर न्यायालयात खटले / गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनं जपून चालवावीत, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.
















