न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२३) :- एका प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या २९ वर्षीय तरुणीने पोलिस चौकीच्या शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निगडी पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या ओटास्कीम पोलिस चौकीत शुक्रवारी (दि .१७) घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
निगडीतील अल्पवयीन मुलगी बुधवारी बेपत्ता झाल्याची तक्रार निगडी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. दरम्यान, एक तरुणी एका अल्पवयीन मुलीसोबत असल्याचा संशय एका स्वयंसेवी संस्थेला आला. त्यांनी याबाबत अहमदनगरमधील कोतवाली पोलिस ठाण्यात माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान ही अल्पवयीन मुलगी निगडी येथून बेपत्ता झाल्याचे समोर आले. कोतवाली पोलिसांनी ही बाब निगडी पोलिसांना कळविल्यानंतर रविवारी या अल्पवयीन मुलीचे वडील व निगडी पोलिसांच्या पथकाने या दोन्ही मुलींना निगडीत आणले.
दरम्यान, या घटनेबाबत अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांचा जबाब ओटास्कीम पोलिस चौकीत घेत होते. त्यावेळी या तरुणीने शौचालयातील ग्रीलला स्वेटरने गळफास घेऊन आत्महत्या केली. खूप वेळानंतरही तरुणी बाहेर न आल्याने दरवाजा तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत निगडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.
















