- म्हणाले, ‘मी राष्ट्रवादीतच कायम राहणार’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२३) :- कारण नसताना माझ्या आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवला जात आहेत. जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या बातम्यांमध्ये कोणतंच तथ्य नाही, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं. जोपर्यंत जिवात जीव आहोत, तोपर्यंत पक्षासोबत राहाणार. या चर्चा थांबवा, तुकडा पाडा, असं म्हणत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. ते मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
पूर्ण आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहोत, राष्ट्रवादीतच राहणार आहोत. मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये बसतो, अनेक जण कामानिमित्त येत असतात. नेहमीप्रमाणे आमदार मला भेटायला आले. त्यात वेगळा अर्थ काढू नका, असंही अजित पवार म्हणाले. सध्या निर्माण झालेले प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठीं हा प्रकार सुरु असल्याचं अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली होती. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही वृत्तात म्हटलं आहे. शिवाय यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.
२०१९ साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही. परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. “नव्या समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत. यात काही तथ्य नाही. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे,” असं अजित पवार म्हणाले.


















