- नियमबाह्य गतिरोधक अनं खडबडीत रस्ता देतोय अपघातांना निमंत्रण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२३) :- देहुगाव येथे विठ्ठलवाडी ते सांगुर्डी आणि विठ्ठलनगर ते येलवाड़ी फाटा हे दोन बाह्यवळण मार्ग आहेत. हे दोन्ही बाह्यवळण मार्ग अतिशय वर्दळीचे आहेत. हजारो वाहने या मार्गावरुन धावत असतात. या मार्गावर अनेक ठिकाणी गतिरोधक असले तरी काही गतिरोधक हे नियमबाह्य आहेत.
नियमबाह्य आणि नियमानुसार बनविलेल्या गतिरोधकांना कुठेही पांढरे पट्टे मारलेले नाहीत. तर पुढे गतिरोधक असल्याचे मार्गदर्शक फलक नसल्याने अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय या मार्गावरील बहुतांशी विद्युत दिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी या मार्गावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
वाहनचालकांना रात्रीच्या अंधारात गतिरोधक दिसत नसल्याने दर दोन दिवसांनी लहान मोठे अपघात होत आहेत. यात अनेकांना अपंगत्व आले आहे. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोन्ही बाह्यवळण मार्गावरील गतिरोधकांना पांढरे पट्टे त्वरित मारावेत; तसेच मार्गदर्शक फलक बसवावेत. रात्रभर सर्व विद्युतदिवे चालू ठेवावेत, अशी मागणी अनेक वाहनचालकांनी केली आहे.


















