न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२३) :- शहरातील इको फ्रेंडली (पर्यावरणपूरक) हाउसिंग सोसायटी व घरांना महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या वतीने सामान्यकरात ५ ते १० टक्के सवलत देण्यात येते. त्या सवलतीचा इको फ्रेन्डली हाउसिंग सोसायटी व मालमत्ताधारकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
शहरातील ५ लाख ९७ हजार ४८७ मिळकतीची पालिकेकडे नोंद आहे. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात ८१७ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यानुसार, सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातही जास्तीत जास्त करवसुली करण्यासाठी करसंकलन विभागाने विविध भरघोस अशा सवलती जाहीर केल्या आहेत. गतवर्षी १२ हजार इको फ्रेंडली सदनिकाधारकांना ६५ लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे. मात्र, शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये ऑनसाईट कंपोस्ट, झिरो वेस्ट व एसटीपी असे इको फ्रेन्डली उपक्रम राबविले जात आहेत. अशा सोसायट्यांना ऑनलाइन अर्ज करून लाभ घेता येईल. मिळकतधारकांनी किंवा सोसायटीधारकांनी कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, तसेच झिरो वेस्ट यंत्रणा कार्यान्वित केली असल्यास त्यांनी तत्काळ पालिकेच्या pcmcindia.gov.in यासंकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा कार्यान्वित असल्यास सामान्य करात ५ टक्के सलवत आहे. एसटीपी कार्यान्वित असल्यास सामान्यकरात ३ टक्के सवलत आहे. ऑनसाईट कंपोस्टींग यंत्रणा व एसटीपी कार्यान्वित असल्यास सामान्यकरात ८ टक्के सवलत आहे. झिरो वेस्ट संकल्पना राबविण्यात येत असलेल्या सामान्यकरात ८ टक्के सवलत आहे. झिरो वेस्ट व एसटीपी कार्यान्वित सामान्यकरात १० टक्के सवलत आहे. बिलाची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणे आवश्यक आहे. इको फ्रेंडली सोसायटी सवलतीचा लाभ घेण्यासाठी निवासी मिळकतधारकांनी प्रथम ऑनलाइन पध्दतीने अर्ज करावा. सवलत रक्कम वगळता उर्वरीत संपूर्ण रक्कम एक रकमी भरणा आवश्यक आहे. यंत्रणा कार्यान्वित नसेल तेव्हा त्या वर्षापासून सवलत रद्द होईल. चुकीची सवलत घेतल्यास संबंधित मिळकतधारक वसुलीस पात्र असणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.


















