- नियोजित वेळेत होणार बिलांचे वाटप; महापालिकेचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने कराची वसुली करण्यात येते. शहरातील मालमत्तांचे अचूक स्थळ शोधण्यासाठी तसेच योग्य ती माहिती संकलित करण्यासाठी ॲपची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच बिलाचे वाटप करण्यासाठी महिला बचत गटांकडे काम देण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या कर संकलन विभागाने २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये एक हजार कोटी रुपये कर वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी बिलांचे वाटप योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे. नागरिकांना मालमत्ता कराची बिले वेळेत पोहोचली जात नाही. त्यामुळे नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करतात. नियोजित वेळेत बिलांचे वाटप करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या प्रशासकीय नियंत्रण व समन्वयाखाली समाज विकास विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या बचत गटांना काम देण्यात येणार आहे
बचत गटांमार्फत नागरिकांना बिलाचे वेळेत वाटप करण्यात येणार आहे. तसेच अचूक मोबाइल नंबर संकलित करण्याचे काम बचत गटामार्फत केले जाणार आहे. त्याचप्रमाणे, नोंद नसलेल्या मालमत्तांचे अचूक स्थळ व माहिती संकलित करण्यासाठी अॅप विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी मे. फॉक्स बेरी या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. मे. फॉक्सबेरी या संस्थेकडून अॅप विकसित करून घेण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीमध्ये मान्यता दिली.















