- चार महिन्यात सात हजारांपेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२३) :- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. रस्त्यांची अवस्था सुधारणे, रस्त्यावरील वाहनांचा वेग स्पीड गनच्या माध्यमातून पाहून कारवाई करणे, जागोजागी मदत केंद्र उभारणे यासह नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पुणे-मुंबई दृतगती मार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. आरटीओच्या वायुवेग पथकाकडून १ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या चार महिन्यांच्या कालावधीत ७ हजार ३१० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर १७ हजार १५६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून ११ हजार ७० जणांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
अति वेगामुळे गेल्या काही वर्षांपासून महामार्गावर अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. सध्या बाजारात अति वेगाने धावणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना तरुणांची मोठी मागणी आहे. कंपनीकडून वाहनांची एक निश्चित वेग मर्यादा ठेवण्यात येत असतानाही अनेक वाहन चालक स्पीडमीटरमध्ये छेडछाड करतात. दुसरीकडे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून महामार्गावरील वाहनांचा वेग पाहून कारवाई करणे, लेन कटिंग, सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे.
ओव्हरस्पीड प्रकरणी सर्वाधिक दोन हजार ६८२ जणांवर कारवाई झाली आहे. १ हजार ५५६ वाहन चालकांवर लेन कटिंग, २ हजार १२८ वाहन चालकांवर सीट बेल्ट न लावणे, ३४७ चालकांवर चुकीच्या ठिकाणी पार्किंग करणे, वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणाऱ्या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. फिटनेस प्रमाणपत्र नसणान्या ३९, इन्शुरन्स नसलेल्या ५५, परमिट नसलेल्या १० तर ३८ प्रवासी बसमध्ये सामानाची वाहतूक करत असल्याचे देखील या तपासणीत आढळून आले. तर २९४ वाहन चालकांवर विविध कारणांमुळे कारवाई करण्यात आली आहे. तसेच वायुवेग पथकाने चार महिन्यात ११ हजार ७० वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळावेत. रस्त्यावरील शिस्त याबाबत आरटीओकडून माहिती देऊन चालकांचे समुपदेशन केले.
द्रुतगती मार्गावर गेल्या चार महिन्यांपासून वायुवेग पथकामार्फत विशष मोहीम राबविण्यात येत आहे. १७ हजार १५६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून ७ हजार ३१० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ११ हजार ७० चालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. वाहन चालकांनी वेगाने वाहने चालवू नयेत. सीटबेल्टचा वापर करावा. लेन कटिंगचे नियम पाळावेत. वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावी.
– अतुल आदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड कार्यालय…















