न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२३) :- ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्या माध्यमातून अवघ्या ५ रुपये प्रतियुनिट प्रमाणे प्रशासनाला वीज मिळणार आहे. त्यासाठी प्रकल्पापासुन ‘पॉवर लाईन’ टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
मोशी कचरा व्यवस्थापन केंद्र येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे कचरा व्यवस्थापन केंद्रापासून महावितरणच्या इंद्रायणी सबस्टेशनपर्यंत ‘पॉवर लाईन’ टाकण्यात येत आहे.
या कामाचे भूमिपूजन आ. महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता उदय भोसले, दिपक मदने, प्रमोद भोसले, मोहिनी गुळुमकर यांच्यासह पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखले, उपकार्यकारी अभियंता सत्वशील शितोळे, कनिष्ठ अभियंता दशरथ वाघोले, संदीप जाधव यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल भालसाखले म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महानगपालिकेच्या ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पाचे काम अखेरच्या टप्यात आसून, ‘पॉवर लाईन’ टाकण्याचे काम सुरू झाले आहे. साधारण ’पॉवर लाईन’ ची लांबी ४.५ किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज प्रति युनिट ५ रुपये प्रमाणे आगामी २० वर्षांकरिता प्रशासनाला मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या वीज बिलामध्ये बचत होणार असून, कचऱ्याचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे. प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता दिवसाला १४ मेगा वॅट इतकी आहे.
आ. लांडगे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून मोशी कचरा डेपोवर कचरा टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले. परिणामी, पर्यावरण आणि नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ‘वेस्ट टू एनर्जी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. हा प्रकल्प कार्यान्वयीत होत असून, लवकरच निर्माण होणारी वीज महापालिका प्रशानाला मिळणार आहे.


















