- सीएसआर फंडातून निधीचे संकलन; दीड वर्षांचा कालावधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने तळवडे येथील रेड झोन हद्दीतील ५८ एकर गायरान जागेत बायोडायसिटी पार्क (जैवविविधता उद्यान) विकसित करण्यात येणार आहे. शहरातील खासगी कंपन्यांकडील सीएसआर फंडातून हे पार्क उभारले जाणार आहे. हे पार्क देशातील आगळेवेगळे उद्यान ठरणार असल्याचा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महापालिकेत राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात तळवडे या जागेत डीअर (हरिण) पार्क उभारण्यात येणार होते. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी स्वतः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे आग्रही होते. राज्यातील महाविकास आघाडीच्या काळात ती गायरान जागा राज्य शासनाकडून महापालिकेत विनामूल्य देण्यात आली. आता त्या ठिकाणी डीअर पार्कऐवजी बायोडायव्हर्सिटी पार्क तयार केले जाणार आहे. डीअर पार्कचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. या प्रकल्पाचा सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे.
या ५८ एकरपैकी ४ एकर व ४ एकर अशा दोन प्रकल्पांसाठी कासारवाडी येथील दोन कंपन्यांनी सीएसआर अंतर्गत निधी दिला आहे. खासगी एजन्सी नेमून तो प्रकल्प उभाण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. उर्वरित ५० एकर जागेतही खासगी कंपन्यांकडून सीएसआर फंड घेऊन प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्यात वेगवेगळी वनस्पती, दुर्मिळ औषधी झाडे व वेली, देशी जातीचे झाडे, फळ व फुल झाडे अश्या संकल्पनेवर प्रत्येक ४ एकरात एका थीमवर झाडांची लागवड करून संवर्धन केले जाणार आहे. त्या ठिकाणी संबंधित प्रकल्पांची माहिती दर्शविणारे फलक असणार आहेत. पर्यटकांना फिरण्यासाठी ट्रॅक असणार असून, खाद्यपदार्थाचे स्टॉलही असणार आहेत. हा प्रकल्प पूर्णपूर्ण सीएआर फंडातून उभारला जाणार आहे. त्यासाठी सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. देशातील सर्वांत मोठा हे बायोडायव्हसिटी पार्क ठरणार असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
पालिकेची अनेक उद्याने आहेत. त्यावर दरवर्षी पालिका मोठा खर्च करते. आता शहरात युनिक रचना असलेले उद्याने तयार करण्याचे नियोजन आहे. खासगी कंपन्या व ठेकेदारांचे सहाय घेऊन पीपीपी तत्वावर उद्याने विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्यानाची देखभाल चांगल्या प्रकारे राखली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे एकूण १९४ सार्वजनिक उद्याने आहेत. हे उद्याने ४७४ एकर क्षेत्रात विकसित केली गेली आहेत. त्यातील काही निवडक उद्यानात विविध थीमच्या आधारे सुशोभीकरण केले जाणार आहे. दुबईत असलेले प्रसिद्ध कारंजे, मुंबईतील मायानगरी, जगातील सात आश्चर्य या संकल्पनेवर उद्याने विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी एजन्सीचे सहाय घेण्यात येणार आहे.


















