न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२३) :- शहरातून वाहणाऱ्या जीवनदायिनी पवना आणि इंद्रायणी नदी सभोवती असलेला जलप्रदूषणाचा विळखा अद्याप सुटलेला नाही. प्रक्रिया न करता नदीपात्रामध्ये थेट मिसळणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण सध्या जवळपास १४ टक्के इतके आहे. महापालिका मैलाशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीपात्रात सोडण्यात येते. मात्र, जवळपास १०० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर टर्सरी ट्रीटमेंटची प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी दररोज १०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.
पवना, इंद्रायणी नदीपात्रात थेट मिसळणारे सांडपाणी हा नेहमीच चिंतेचा मुद्दा राहिला आहे. त्यामुळे पवना आणि इंद्रायणी नदीत मासे मृत होण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. शहरामध्ये सध्या दररोज ५२० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. महापालिकेच्या माध्यमातून ४९० दशलक्ष लिटर तर एमआयडीसीच्या माध्यमातून ३० एमएलडी इतके पाणी देण्यात येते. त्यापैकी २५ टक्के म्हणजेच सुमारे १३० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गळती होते. त्यानुसार दररोज सरासरी ३९० दशलक्ष लिटर पाण्यापैकी ८० टक्के सांडपाणी म्हणजेच ३१२ दशलक्ष लिटर इतके सांडपाणी तयार होते. या एकूण सांडपाण्यापैकी महापालिकेकडून सध्या २७० दशलक्ष सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. म्हणजेच ८६.५४ टक्के इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया होत आहे. अद्याप १३.४६ टक्के इतके सांडपाणी नदीपात्रात थेट मिसळत आहे.
पवना नदीच्या दोन्ही बाजूने ३२ किलोमीटर अंतरात इंटरसेप्टर सिव्हेज लाइन टाकण्याचे काम केले जात आहे. तर, इंद्रायणी नदीच्या एका बाजूला तळवडे ते डुडूळगाव दरम्यान १२ किलोमीटर अंतरात इंटरसेप्टर सिव्हेज लाइन टाकण्यात येत आहे. या दोन्ही लाइनचे काम सध्या ८५ टक्के पूर्ण झाले आहे. मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नदीपात्रात थेट मिसळणारे सांडपाणी प्रथम प्रक्रिया करण्यासाठी मैलाशुद्धीकरण केंद्रात नेता येणार आहे. प्रक्रिया झाल्यानंतरच हे सांडपाणी नदीपात्रात सोडले जाईल.
शहरामध्ये सध्या एकूण १४ मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांची एकूण प्रतिदिन क्षमता ३५३ दशलक्ष लिटर इतकी आहे. प्रत्यक्षात २७० दशलक्ष लिटर सांडपाण्यावरच प्रक्रिया केली जाते. केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत पिंपळे निलख (२० दशलक्ष लिटर), बोपखेल (१० दशलक्ष लिटर), चिखली (२० दशलक्ष लिटर) येथे मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा कार्यवाही झाली असून प्रत्यक्ष काम सुरु होणे बाकी आहे. त्याचप्रमाणे, महापालिकेच्या माध्यमातून कुदळवाडी नाल्यावर ३ एमएलडी तर, भोसरी, सर्व्हे क्रमांक २१७ येथे ७ एमएलडी क्षमतेचा मैलाशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.
पिण्याव्यतिरिक्त वापरासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पालिकेकडून टर्सरी ट्रीटमेंटची प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात कासारवाडी (७५ दशलक्ष लिटर), चिखली मैलाशुद्धीकरण केंद्र (२० द.ल. लिटर) आणि च-होली (५ द.ल. लिटर) अशा एकूण ३ ठिकाणी एकूण १०० द.ल. लिटर सांडपाण्यावर दररोज टर्सरी ट्रीटमेंट केली जाणार आहे. शहरामध्ये टर्सरी ट्रीटमेंट केलेल्या पाण्यासाठी वितरण नलिका टाकण्यात येणार आहे. हे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे पाणी पालिकेकडून सध्या पाण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या दरापेक्षा २० टक्के कमी दराने उपलब्ध होणार आहे. या पाण्याचा उपयोग उद्यानांसाठी बांधकामासाठी, फ्लोअर वॉशिंग, वाहने धुणे, औद्योगिक वापरासाठी शक्य आहे.
पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या बाजूने इंटरसेप्टर सिव्हेज लाइन टाकण्याचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे काम झाल्यानंतर महापालिका हद्दीतील थेट नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यावर मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करणे शक्य होणार आहे. कासारवाडी येथे ७५ एमएलडी सांडपाण्यावर टर्सरी ट्रीटमेंट करण्याचे काम पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर हे काम सुरु होऊ शकेल.
-संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता (पर्यावरण), महापालिका…


















