न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२३) :- पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विशेष मोहीम राबवली जात आहे. त्यामध्ये मागील पाच महिन्यात आरटीओच्या एका पथकाने हजारो वाहनांवर कारवाई केली आहे.
आरटीओच्या वायुवेग पथकाकडून डिसेंबर ते एप्रिल या पाच महिन्यांच्या कालावधीत नऊ हजार ३५७ वाहन चालकांवर विविध प्रकारची कारवाई करण्यात आली. द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. रस्त्यांची अवस्था सुधारणे, रस्त्यावरील वाहनांचे वेग कमी करणे, जागोजागी मदतकेंद्र उभारणे यासह नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करणे, अशा उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाच्या वायुवेग पथकाने द्रुतगती मार्गावर तब्बल नऊ हजार ३५७ वाहन चालकांवर कारवाई केली. त्यात मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, लेन कटिंग आणि सीटबेल्ट न वापरणे याबाबत सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे.
ओव्हरस्पीड प्रकरणी सर्वाधिक ३ हजार ७७१ जणांवर कारवाई झाली आहे. तर वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलल्या प्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. पाच महिन्यांच्या कालावधीत वायुवेग पथकाने २० हजार ६१ वाहनांची तपासणी केली. प्रवासी बसमध्ये सामानाची वाहतूक करत असल्याचे देखील या तपासणीत आढळून आले. याबाबत ३८ बसेसवर कारवाई झाली आहे. वायुवेग पथकाने पाच महिन्यात हजारो वाहन चालकांचे समुपदेशन केले. वाहन चालकांना वाहतुकीचे नियम पाळावेत. रस्त्यावरील शिस्त याबाबत आरटीओ कडून वाहन चालकांना माहिती देण्यात आली.
वेगाने वाहने चालवू नयेत. सीटबेल्टचा वापर करावा. लेन कटिंगचे नियम पाळावेत. वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालवावी
– अतुल आदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड…
















