न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२३) :- सन २०२३-२४ या आर्थिक वर्गाच्या सुरुवातीला अवघ्या दीड महिन्यात मिळकतकर बिलातून एकूण १०० कोटींचा भरणा नागरिकानी केला आहे. भरणा करणाऱ्या ८७ हजार ४५६ पैकी ७० हजार ४८९ नागरिकांनी ऑनलाइन बिल भरले आहे. ऑनलाइन माध्यमातून सर्वाधिक ८० कोटींचा भरणा झाला आहे.
शहरात औद्योगिक, निवासी, बिगरनिवासी मिश्र आणि मोकळ्या जमीनी अशा एकूण ५ लाख ९८ हजार मिळकतींची नोंद पालिकेच्या कर संकलन विभागाकडे आहे. सन २०२३-२४ या वर्षातील बिलांचे वाटप महिला बचत गटाद्वारे करण्यात येत आहे. सुमारे तीन लाख नागरिकांना बिलाचे वाटप करण्यात आले आहे.
वाकड विभागीय कार्यालयात सर्वाधिक १४ हजार ७६८ जणांनी बिले भरली आहेत. त्यापाठोपाठ थेरगाव ९ हजार २२८, चिंचवड ८ हजार ४७०, सांगवी ८ हजार ३८७ आणि सर्वात कमी पिंपरी कॅम्पमध्ये केवळ ७१४, तळवडेमध्ये ७१८ नागरिकांनी मिळकत कर भरला आहे.
दरम्यान, ३१ मार्च २०२३ अखेर ज्यांची १ लाखांपेक्षा जास्त थकबाकी होती, अशा २२ हजार मिळकतधारकांना जप्ती पूर्व नोटीसा बिलासोबत देण्यात येत आहेत. बिलांचे वाटप होताच जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.
तीन जूनपूर्वी मिळकत कराची बिले भरल्यास मिळकतधारकांना सामान्यकरात मोठी सूट देण्यात येते. नागरिकांनी मिळकतकराची बिले भरून या सलवतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
















