न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने केलेल्या पाहणीत महापालिका मुख्यालयासह क्षेत्रीय कार्यालये, महापालिका रुग्णालयात तब्बल २३५ अधिकारी, कर्मचारी जागेवर हजर नसल्याचे समोर आले होते. कार्यालयीन वेळेत नागरिकांची कामे सोडून बाहेर फिरणाऱ्या या अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करून १५ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त वामन नेमाणे यांनी दिले आहेत.
महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर सिंह हेच प्रशासक म्हणून कामकाज पाहत आहेत. मात्र, प्रशासकीय राजवटीत पालिकेत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.
पालिकत आलेल्या नागरिकांना अधिकारी, कर्मचारी भेटत नाहीत. कार्यालयीन वेळेत नेमून दिलेल्या जागेवर उपलब्ध नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. पर्यायाने आयुक्त सिंह यांच्या कारभारावर नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती.
















