- दिव्यांगाना पाचशे रुपयात मिळणार लाखाचा विमा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२३) :- भारत सरकारच्या दिव्यांग निरामय आरोग्य विमा योजनेअंतर्गत चार प्रकारच्या दिव्यांगांसाठी वार्षिक देयक रक्कम पिंपरी चिंचवड महापालिका भरणार आहे. ऑटीझम, सेरेब्रल पाल्सी, मतिमंद व बहुविकलांग आदींचा यामध्ये समावेश आहे. पिंपरी- चिंचवड महापालिकेचा समाज विकास विभाग, पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व महात्मा गांधी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेतला असल्याची माहिती संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समितीच्या वतीने देण्यात आली.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय न्यास अधिनियम १९९९ या कायद्यानुसार बौद्धिक अक्षम, सेरेब्रल पाल्सी, ऑटीझम, एकाधिक दिव्यांग या चार दिव्यांग प्रवर्गासाठी निरामय विमा योजना आहे. या योजनेमध्ये एका वर्षासाठी बीपीएल लाभार्थीला २५० व एपीएल लाभार्थीसाठी ५०० रुपयांमध्ये १ लाख रुपयांचा लाभ घेता येतो. यामध्ये थेरपी खर्च, प्रवासखर्च, औषधीखर्च बाबींचा समावेश आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील यूडीआयडीधारक मतिमंद, सेरेब्रल पाल्सी, ऑटीझम व एकाधिक दिव्यांगत्व प्रकारातील साधारण ३ हजार दिव्यांगांचा महापालिका विमा उतरणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
महात्मा गांधी सेवा संघ ही संस्था राष्ट्रीय न्यासाकडील नोंदणीकृत संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून निरामय योजनेचे अर्ज भरले जाणार आहेत. क्लेमची प्रकिया समजण्यासाठी दिव्यांगांना तसेच त्यांच्या पालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. योजनेची पुढील कार्यवाही महात्मा गांधी सेवा संघ संचलित पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत केली जाणार आहे.
महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. दिव्यांग व्यक्ती कायद्यानुसार उर्वरित दिव्यांगांसाठीदेखील पिंपरी महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आरोग्य विमा संरक्षण योजना राबवणे गरजेचे
– हरिदास शिंदे, अध्यक्ष, संयुक्त दिव्यांग हक्क सुरक्षा समिती, पुणे…