न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२३) :- ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान पुणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात ३० मे रोजी या अभियानांतर्गत हजारो लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप केले जाणार आहे. लाभार्थ्यांना एकाच छताखाली विविध विभागांच्या योजना, सेवांचा लाभ घेता येणार आहे.
पुरवठा विभागाकडून रेशन कार्डमध्ये नावे कमी करणे, वाढवणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेला यात सहभागी करून घेतले आहे. विभागनिहाय स्टॉल राहणार आहेत. त्यात आरोग्य विभागाचाही स्टॉल राहणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा स्टॉल आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय पेन्शन योजना, रहिवासी, उत्पन्न तसेच विविध दाखले, सातबारा वाटप करण्यात येणार आहे.
या अभियानात विविध २७ विभागांचा सहभाग आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहर हा नागरी भाग असल्याने सर्वच विभागांच्या योजना लागू होत नाहीत. १० ते १२ विभागांशी संबंधित सेवा, योजना उपलब्ध होतील.
– अर्चना निकम – अपर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड…शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी जनजागृती करून संबंधित विभागांशी समन्वय साधण्यात येत आहे. – प्रवीण ढमाले -निवासी नायब तहसीलदार, पिंपरी-चिंचवड…