- ११० एकर गायरान जमीनीवर होऊ शकते सुसज्ज पोलीस आयुक्तालय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी मध्यवर्ती ठिकाणी जागेचा शोध सुरू आहे. देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील गायरानाची जागा त्यासाठी योग्य असल्याचे पोलीस अधिकारी खासगीत सांगत आहेत.
ही जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र देहू ही जागा देण्यासाठी अनुकूल नाही. आगामी काळात होणारा शहराचा विस्तार आणि भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी लागणाऱ्या जागेचा विचार केल्यास भविष्यात गायरानाची जागा उपयुक्त पडणार आहे. त्यामुळे येथील जागा कोणत्याही संस्थेला देऊ नये असा ठराव २० एप्रिल रोजी नगरपंचायतीत झालेल्या सभेत ठराव क्रमांक २१ नुसार केला आहे. गायरानाची ही जागा शहराचे विस्तारीकरण, वाढती लोकसंख्या पाहता या जागेची गरज असून, ही सरकारी गायरान जागा पोलीस आयुक्तालयासह कोणत्याही संस्थेस देऊ नये, असे या ठरावात म्हटले आहे.
सरकारी गायरान जागाच हवी असेल तर देहूपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या येलवाडी गावची ११० एकर गायरान जमीन आहे. हे ठिकाण श्री क्षेत्र देहूगाव व श्री क्षेत्र भंडारा डोंगर, श्री क्षेत्र येलवाडी यांच्या मध्यवर्ती आहे. या ठिकाणी जमीन सपाट आहे. पोलीस आयुक्तालय झाल्यास येथे कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना तातडीने हालचाल करता येईल. पोलीस परेड मैदानासह निवास व्यवस्था, पार्किंग विकसित करता येईल. ही जागा तळेगाव- चाकण राज्य मार्गाला लागून आहे. येलवाडी येथे आयुक्तालय उभारल्यास मावळ तालुका पोलिसांच्या मुख्यालयाच्या नियंत्रणात येईल व गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल.