- ठेकेदारांना भाडे तत्वावर देण्याचा प्रशासनाचा घाट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रेक्षागृह व नाट्यगृहावर नियमित खर्च करणे परवडत नसल्याने त्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नाट्यगृह भाडे तत्वावर खासगी संस्थेच्या हवाली करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने लवकरच निविदा काढली जाणार आहे.
महापालिकेच्या जलतरण तलावांप्रमाणे आता नाट्यगृहाचे खासगीकरण करण्यात येत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, प्राधिकरण, निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह असे पालिकेचे पाच नाट्यगृह आहेत.
शहरात चिंचवडचे प्रा. मोरे प्रेक्षागृहास बारा महिने मोठा प्रतिसाद असतो. ते नाट्यगृह सोडून उर्वरित चारही नाट्यगृह खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. नाट्यगृहाचे संपूर्ण संचालन खासगी संस्था करणार आहे. त्या बदल्यात संस्थेकडून पालिका निश्चित उत्पन्न घेणार आहे. दरमहा सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या संस्थेला नाट्यगृह चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. तो कालावधी ५ ते १० वर्षे असू शकतो. त्यामुळे पालिकेला या नाट्यगृहावर अधिक खर्च करावा लागणार नाही. उलट, दरमहा ठराविक उत्पन्न मिळणार आहे, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या संदर्भात लवकरच निविदा काढून इच्छुक संस्थेकडून दर मागविण्यात येणार आहेत.
महापालिकेचे शहरातील सहा नाट्यगृहावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. मात्र, त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे चिंचवडचे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह सोडून उर्वरित चार नाट्यगृह खासगी संस्थांना चालविण्यासाठी भाडे तत्वावर देण्यात येणार आहेत. प्रायोगिक व व्यावसायिक नाटक, शैक्षणिक संस्थेचे स्नेहमेळावा, इतर मेळावे, समारंभ, स्पर्धा, खासगी कार्यक्रम या प्रमाणे वेगवेगळा दरानुसार शुल्क आकारले जाईल. नाटयगृहाचे संपूर्ण संचालन खासगी संस्था करणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी सांगितले.