न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२३) :- पावसाळा साधारण महिन्यांवर येऊन ठेपला आहे. शहरात धोकादायक इमारतीचे महापालिकेच्या वतीने दरवर्षी सर्वेक्षण करण्यात येते. सुमारे सव्वाशे धोकादायक इमारती आहेत. त्यांना नोटिसा दिल्या आहेत. इमारतीमध्ये शेकडो नागरिक राहतात? या ठिकाणी बहुतांश भाडेकरू अधिक आहेत. त्यांनी आपल्या मालकांना दुरुस्तीबाबत सूचना केल्या आहेत.
पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींना महापालिकेच्या प्रभागस्तरीय कार्यालयांच्या वतीने नोटीस देण्यात येते. पावसाळा सुरू होत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका व संभाव्य जीवितहानी दूर करण्याच्या दृष्टीने धोकादायक इमारतीचा भाग काढून घ्यावा. दुरुस्ती करावी. तसेच धोकादायक इमारती काढून घ्याव्यात, असे आवाहन महापालिकेच्या वतीने केले आहे.
शहरातील एखादी इमारत तिचा काही भाग, छप्पर, जिना धोक्याच्या अथवा पडण्याच्या स्थितीत आहे. याबाबत महापालिकेस लेखी कळवावे, अशा इमारतींची पाहणी करून धोका नाहीसा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहे किवा एखाद्या इमारतीचा अथवा आकस्मिकरीत्या कोसळल्यास दुर्घटना घडल्यास महापालिकेत (दूरध्वनी क्रमांक २७४२५५११), (६७३३३३३३) या क्रमांकावर माहिती कळवावी.
पावसाळ्याच्या काळात नागरिकांनी धोक्याच्या इमारतीमध्ये न राहता दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करणे अधिक योग्य होईल. धोक्याच्या इमारतींबाबत दुरुस्तीसाठी मालक अथवा भाडेकरू यांच्याकडून येणा-या अर्जाचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. पावसाळा सुरू होत असल्याने जुन्या इमारतींना पावसाळ्यामुळे धोका निर्माण होतो, अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना व त्या इमारतीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका होऊ शकतो. तो टाळण्याच्या दृष्टीने जुन्या इमारतीची पाहणी केली जाणार आहे.
इमारत सुरक्षित राखण्याची जबाबदारी महापालिका अधिनियम कलम २६५ अन्वये प्रत्येक इमारत मालकाची आहे. त्यासाठी इमारतीची तपासणी तज्ज्ञ अभियंताकडून करून घ्यावी. इमारत दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
– मकरंद निकम (शहर अभियंता)…