- मुख्यमंत्री कार्यालयाचे बनावट बोधचिन्ह वापरून शासनाची फसवणूक….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही पदावर अथवा शासकिय,अधिकारी अथवा कर्मचारी नसताना आरोपीने सिम्बायोसिस एसआयबीएम पुणे, लवळे, हिंजवडी व बेंगलोर येथे सी.एम.ओ कार्यालयातील व्यक्ती असल्याचे फोनव्दारे सांगुन विद्यार्थ्यांचे अँडमिशन करुन घेतले. तसेच सी.एम.ओ कार्यालयातील असल्याचे भासवण्याकरिता व लोकांची फसवणूक करण्याकरिता मोबाईलच्या ट्रू कॉलर प्रोफाईलला तसेच व्होट्सअॅप डि.पी.ला. महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह ठेवले. त्याखाली सि.एम.ओ. ऑफीस, महाराष्ट्र शासन, मुंबई मंत्रालय अशी प्रोफाईल बनवुन व्हॉट्सअॅपच्या स्लोगनमध्ये सीएमओ, पीआरओ ऑफिस, एकनाथ भाई शिंदे, मुंबई मंत्रालय, महाराष्ट्र शासन, असा मजकुर ठेवला. त्याखाली मुंबई मंत्रालयाचे गुगल लोकेशन ठेवले व बनावट इमेल आयडी ठेवला.
महाराष्ट्र शासनाचा कोणताही लोकसेवक नसताना लोकसेवक असल्याची बतावणी केली. लोकसेवक वापरतो तसे ओळखचिन्ह वापरुन शासनाच्या लौकिकास बाधा आणण्याकरिता बोधचिन्हाचा वापर करुन त्याद्वारे विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी बोधचिन्हाचा व बनावट नावाचा वापर केला. दबाव आणुन स्वतःच्या आर्थिक फायदासाठी विद्यार्थ्यांना संस्थेमध्ये अॅडमिशन मिळुन दिले.
त्याविरोधात (दि. २१) रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडुन हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार आरोपी राहुल राजेंद्र पालांडे (वय ३९ वर्षे, रा. केशवनगर, चिंचवड) याच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गु.र.नंबर- ६४० / २०२३ भा.दं.वि. कलम ४१७, ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७२, ४८४, ४८८, १७०, १७१ सह आय टी अॅक्ट ६६ (सी) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही गंभीर स्वरुपाची बाब असल्याने पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी चिंचवड यांना तात्काळ कठोर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आरोपीला तांत्रिक विश्लेषणाचा उपयोग करुन तात्काळ शिताफीने अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने (दि. २९) पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केली आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट ४ हे करत आहेत.