न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरभरात नाट्यगृह व प्रेक्षागृह बांधले आहेत. तसेच, सार्वजनिक ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका सुरू केल्या आहेत. हे कामकाज सुरळीत राहावे म्हणून ते विभाग क्रीडा विभागाकडे सोपविण्याचा निर्णय आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आहे.
महापालिकेचे चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकारामनगर येथे आचार्य अत्रे रंगमंदिर, भोसरीत कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह, नवी सांगवीत
नटसम्राट निळू फुले रंगमंदिर आणि प्राधिकरण, निगडीत ग. दी. माडगुळकर नाट्यगृह असे एकूण पाच नाट्यगृह आहेत. त्याचे कामकाज संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या मार्फत चालते. या कामकाजामध्ये प्रशासकीय गतिमानता, कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवजाची सुरक्षितता आणि निर्णय घेणे सुलभ व्हावे म्हणून क्षेत्रीय कार्यालयाकडील नाट्यगृहाचे कामकाज क्रीडा विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय आयुक्त सिंह यांनी घेतला आहे.
तेथील अधिकारी व कर्मचारी क्रीडा विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहेत. त्यामुळे या पुढे सर्व नाट्यगृहाच्या बुकिंगसाठी क्षेत्रीय कार्यालयाऐवजी खराळवाडी, पिंपरी येथील क्रीडा विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.
महापालिकेचे शहरभरात सार्वजनिक ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका आहेत. त्याचा लाभ शेकडो विद्यार्थी व परीक्षार्थी घेत आहेत. ग्रंथालय व अभ्यासिका क्षेत्रीय कार्यालयामार्फत चालविल्या जातात. शहरातील सर्व ग्रंथालय आणि परीक्षा केंद्र व अभ्यासिका क्रीडा विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय आयुक्त सिंह यांनी घेतला आहे. याबाबतचा आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी जारी केला आहे.












