न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२३) :- महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ५८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय साहित्य खरेदीसाठी विद्यार्थी- पालकांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट रक्कम जमा केली जाणार आहे. पहिली ते चौथीसाठी ३ हजार ५०० आणि पाचवी ते दहावीसाठी ३ हजार ७०० रुपये रक्कम आहे. त्यासाठी एकूण सुमारे २० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. १३) स्थायी समितीमध्ये मान्यता दिली. त्यामुळे डीबीटीचा मार्ग मोकळा झाला आहे. ती रक्कम येत्या शुक्रवार (दि. १६) पासून खात्यात जमा करण्यास सुरुवात होईल. तिचे उद्घाटन उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
पालिकेच्या १३८ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळा आहेत. त्या शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत सुमारे ५८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष सुरू झाल्यानंतर वह्या, दप्तर, रेनकोट, विविध अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके असे शालेय साहित्य मोफत दिले जाते. या शालेय विभागातून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे दरवर्षी साहित्य वाटपास विलंब होत होता.
प्रशासकीय राजवटीमध्ये शालेय साहित्य डीबीटीद्वारे देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्या प्रस्तावाला आयुक्त सिंह यांनी मान्यता दिली आहे. ही रक्कम बँक खात्यावर जमा करण्यास शुक्रवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. बँक खात्याची माहिती अपडेट करीत त्यानंतर १५ दिवसांत सर्व विद्यार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील बाजारपेठेत शालेय साहित्याचे दर लक्षात घेऊन पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये निश्चित केले आहेत. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ३ हजार ७०० रुपये ठरविण्यात आले आहेत. त्याला शालेय समितीने मान्यता दिली आहे. इयत्ता व वर्गनिहाय विद्यार्थी व त्यांचे बँक खात्याची माहिती जमा केली आहे. टप्प्याटप्प्याने सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.












