- मुख्यमंत्र्यांची ती भेट म्हणजे केवळ ‘राजकीय स्टंटबाजी’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- कोणताही नियोजित कार्यक्रम नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अण्णा बनसोडे यांची शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास अचानक भेट घेतली. त्यानंतर काहीच क्षणात मुख्यमंत्र्यांसह खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे व बनसोडे यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे बनसोडे यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा रंगल्याने पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर शुक्रवारी होते, थेरगाव व निगडीतील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या काळभोरनगर येथील कार्यालयाकडे वळाला. बनसोडे यांच्या कार्यालयात पोहोचला. त्यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे व भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे उपस्थित होते. त्यानंतर काही काळ बनसोडे यांच्या केबिनमध्ये चौघांची काहीवेळ चर्चा झाली. त्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून नाराज असलेले आमदार बनसोडे हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक संदीप चिंचवडे, प्रसाद शेट्टी, शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे आदीही तिथे उपस्थित होते.
दरम्यान अण्णा बनसोडे यांनी ही भेट राजकीय नसून केवळ प्रासंगिक आहे. शिवसेनेत प्रवेश करणार नाही, असे माध्यमांना सांगितले. त्यामुळे हा केवळ प्रसिद्धी स्टंट ठरला आहे.
एकनाथ शिंदे हे चांगले मुख्यमंत्री आहेत. त्यानी आमच्या मतदारसंघातील अनेक प्रश्न तातडीने सोडविले आहेत. आज निगडी येथे कार्यक्रमासाठी आले असताना मी त्याना कार्यालयात येण्याची विनंती केली. त्यानुसार त्यानी माझी भेट घेतली. त्याचा राजकीय अर्थ कोणीही घेऊ नये.
– अण्णा बनसोडे, आमदार…















