- जप्ती कारवाई आणि सर्वेक्षणाचे काम होणार सुलभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- पिंपरी-चिंचवड शहरातील थकबाकीदारांकडून मिळकतकर बिलांची वसुली आणि मिळकत सर्वेक्षणासाठी आवश्यक सुरक्षा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा प्राधिकरणाच्या (एमएसएफ) रायफलधारी ४० जवानांचे सहाय्य करसंकलन विभाग घेणार आहे. त्यासाठी एका वर्षाच्या कालावधीसाठी १ कोटी ३३ लाख ८१ हजार इतका खर्च अपेक्षित आहे. त्याला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंजुरी दिली आहे.
करसंकलन विभागाच्या वतीने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसा देऊन मिळकत जप्तीची कारवाई केली जाणार आहे. शहरातील सर्व मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मिळकत जप्ती कारवाई आणि सर्वेक्षण करताना कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एमएसएफचे ४० जवान नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे जप्ती कारवाई आणि सर्वेक्षण करणे सुलभ होणार आहे.
या पथकात १ सुरक्षा पर्यवेक्षक, ४ मुख्य सुरक्षा पर्यवेक्षक, ५ रायफलधारी सुरक्षा पर्यवेक्षक, २० लाठी सुरक्षा पर्यवेक्षक पुरुष, १० लाठी सुरक्षा पर्यवेक्षक असे ४० जण असणार आहे. त्यांचे महिन्याचे एकूण वेतन ११ लाख १५ हजार १०० इतके आहे. वर्षभराचा वेतनाचा खर्च १ कोटी ३३ लाख ८१ हजार २०० इतका आहे. हे पथक ३१ मार्च २०२४ पर्यंत नेमले जाणार आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली आहे.
दरम्यान, या पूर्वी महापालिकेने बिले वसुलीसाठी तृतीयपंथीयांचे पथक तैनात केले होते. त्यांच्या माध्यमातूनही बिले वसुली केली जात आहे. तर, शहरात घरोघरी जाऊन मिळकतकर बिलांचे वाटप महिला बचत गटांच्या सदस्यांनी केले आहे.















