- तब्बल २३५ जणांची बदली; राजकीय दबाव आणल्यास कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- महापालिकेत विविध १५ पदांवरील एकूण २३५ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून महापालिका प्रशासनात मोठे फेरबदल केले आहेत. ३० जूनपर्यंत बदल्या न झाल्याने कर्मचारी निवांत झाले होते. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनी बदल्यांचा निर्णय घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत कार्यकारी अभियंता, उपअभियंता, भांडारपाल, सहायक भांडारपाल, मुख्य लिपिक, लिपिक, कॉम्प्युटर ऑपरेटर, वाहनचालक, स्थापत्य कनिष्ठ अभियंता, विद्युत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, मजूर शिपाई अशा १५ पदांवरील एकूण २३५ जणांची बदली करण्यात आली आहे. बदल्यांचे आदेश काढत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदस्थापना झालेल्या विभागात रुज होण्यास सांगितले आहे.
महापालिकेच्या बदली धोरणानुसार अधिकाऱ्यांची तीन वर्षांनंतर, तर कर्मचाऱ्यांची सहा वर्षानंतर एका विभागातून दुस-या विभागात बदली होणे अपेक्षित आहे. परंतु, महापालिकेतील विविध विभागांत असंख्य अधिकारी, कर्मचारी बदलीसाठी पात्र असतानादेखील त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. त्यामुळे पालिकेत लाचखोरी, भ्रष्टाचाराला बळ मिळत असल्याचे मागील काही महिन्यांतील घटनांवरून दिसून येत होते. तर, आयुक्त सिंह यांनी बदल्यांच निर्णय लांबणीवर टाकला होता. परंतु, अखेर त्यांनी हा बदल्यांचा निर्णय घेत सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांना झटका दिला आहे.
बदलीच्या ठिकाणी रुजू न होता बदली आदेशाचा अवमान केल्यास, तसेच बदली रद्द करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या राजकीय दबाव आणल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईचे संकेत आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. या गैरवर्तवणुकीची नोंद घेऊन संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, बदली झालेल्या अधिकारी, कर्मचायांना येत्या १५ दिवसांत कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र देखील संबधित विभागात सादर करावे लागणार आहे. असे बदली आदेशात म्हटलेले आहे.













